Tuesday, 9 August 2022

तेरा जाना

 



आज सकाळी ती बातमी आलीच – लतादिदी गेल्या ! गान-सरस्वती काळाच्या कुशीत लुप्त झाली. भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. सर्वत्र शोकसंवेदनांचा पाऊस आहे. 92 वर्षांचे परिपुर्ण आणि तृप्त आयुष्य जगून त्या स्वरांच्या सम्राज्ञीने आज ह्या जगाचा भावपूर्ण निरोप घेतलाय. बोरकरांच्या शब्दात सांगायचं तर “देखणी ती जीवने जी तृप्तीची तिर्थोदके / चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पार्‍यासारखे”. तृप्तीचे तिर्थोदक झाले ते जगणे! लता मंगेशकर नावाचे एक युग आज संपले.

पण लता गेली का ? छे ! लता कुठेच नाही गेली!! हजारो गीतांच्या स्वर्गीय स्वर्णीम स्वरमालांमध्ये ती जिवंत आहे, जिवंत राहील. आनंदमठ मधली ती लखलखती स्वरांची तलवार, ये रात भीगी भीगी  मधला किंवा जागो मोहन प्यारे  मधला तो आलाप, मेघा छाये आधी रात मधली ती आर्तता .... या चिमण्यांनो परत फिरा रे मधली ती व्याकूळता, सुंदर ते ध्यान अभंगामध्ये मकर कुंडल तळपती मध्ये लागलेला तो इश्वरी आवाज, कुछ दिल ने कहा, कुछ भी नही मधला तो मधाळ मखमली स्वर, ए दिले नादान मधली भव्यता, ए मेरे वतन के लोगों मधली भावपूर्णता ... हे सगळं ती इथेच सोडून गेली आहे आपल्यासाठी, तिच्या स्वरांच्या करोडो चाहत्यांसाठी!

एकदा लताची गाणी ऐकत बसलो होतो. हकीकत मधलं “खेलो ना मेरे दिल से” हे गीत पुन्हा पुन्हा ऐकलं .. मग तेच गीत इतर काही गायिकांच्या आवाजात उपलब्ध आहे, तेही ऐकून पाहिलं. उत्तम गायलंय त्यांनीही. पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत राहिलं. कान आणि मन दोन्ही तृप्तच झाले नाहीत. मग पुन्हा लताच्या आवाजात मूळ गीत ऐकलं तेव्हाच खरं समाधान लाभलं. असं का व्हावं? लताचा आवाज ज्या उंचीवर पोहोचतो, जे नेमके सुर लागतात आणि त्या सुरांच्या पल्याड जे तिचे गाणे दरवळत राहते.. त्याला जगात तोड नाही. तिच्या आसपासही कोणीही पोहचू शकत नाही हे जाणवत राहिले. लताचा आवाज म्हणजे भाव आणि स्वर यांचा अप्रतिम संगम आहे! भाव म्हणजे गंगा आणि स्वर म्हणजे यमुना यांचा संगम लताच्या आवाजात आहेच, पण त्यापलिकडेही काहीतरी आहे.. एक इश्वरी स्पर्श .. आणि ती आहे गुप्त सरस्वती. म्हणजेच तिचा आवाज हे स्वत:च एक प्रयाग तिर्थ आहे !   

मराठी भावगिते असोत की सावरकांची विरश्रीयुक्त गीते असोत, हिंदी चित्रपटांमधली गीते असोत , मराठी किंवा अन्य भाषांमधली. आनंदघन म्हणून स्वत: संगीतबद्ध केलेली अजरामर गीते असोत की असंख्य गीतकारांच्या- संगीतकारांच्या शब्द-सुरांचे आव्हान असो... तिने प्रत्येक गीत लिलया पेलेले आणि त्यावर स्वत:च्या इश्वरी आवाजाची प्रत्यंचा सुद्धा चढवली. गेली आठ दशके तिने राज्य केले .. लताचे राज्य सर्वदूर पसरले होते.. संपूर्ण विश्वात !  

आता प्रत्यक्ष इश्वराच्या सान्निध्यात लताचे गाणे बहरत राहील !  तिथे तिच्या स्वागताला भिमण्णा आहेत, रफी, किशोर, मुकेश, पंचमदा , मदनमोहन, शंकर, जयकिशन असे अनेक दिग्गज आधीच उपस्थित आहेत. आणि इथे? इथे तर तिचे गाणे सार्‍या आसमांताला व्यापून उरलेले आहेच. असे असले तरीही ती अपल्यात नाही .. ही एक रुखरुख राहीलच.... हरवले ते गवसले का ? गवसले ते हरवले का ?’ अशी मनाची अवस्था आहे !

तिचा आवाज तर आधीच स्वर्गीय होता .. आज तीही स्वर्गीय झाली. आपण लतायुगात जन्मलो हे आपण आपले भाग्य मानावे आणि तिच्या स्वरांची आठवण आली की तिची गाणी मनसोक्त ऐकत बसावीत... तेरा जाना ... दिला के अरमानोंका लुट जाना ... तेरा जाना”  


-----  प्रसन्न शेंबेकर 9423565101

तेरा जाना

  आज सकाळी ती बातमी आलीच – लतादिदी गेल्या ! गान-सरस्वती काळाच्या कुशीत लुप्त झाली. भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. सर्वत्र शोकसं...