Friday, 26 February 2021

विंग कमांडर अशोक मोटे: आभाळासारख़ा उंच माणूस

मोटे काका गेल्याची बातमी आली आणि डोळ्यांसमोरुन त्यांच्या सगळ्या भेटी, त्यांचे फोन कॉल्स, त्यांचा भारदस्त आवाज अशा अनेक आठवणी तरळून गेल्या. मोटे काका खरंच गेले का? विश्वास बसत नाही.
आम्ही त्यांना ‘मोटेकाका’ असंच म्हणायचो. कारण ते आमच्या कुटुंबाच्या खूप जवळचे होते. त्यांचे आमचे संबंध घरोब्याचे होते. (तसे त्यांचे घरोब्याचे संबंध कित्येकांशी होते, त्यातला मी एक.) त्यांची उंची कमी होती पण व्यक्तीमत्व अत्यंत रुबाबदार आणि वाणी मार्दवपूर्ण! ते बोलायला लागले की त्यांच्या क्षमतांची क्षितिजं उलगडत जायची... आयुष्यभर नभात उंच विहार करून ह्या माणसानं आपल्या व्यक्तीमत्वालाही नभासारखंच उंचावलंय आणि तेवढंच रुंदावलंय सुद्धा !
त्यांच्या सोबतचा एक प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी काकांना माझ्या कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला बोलावलं होतं. विषय होता “कारगीलचे युद्ध”. इतर वक्त्यांना मागायचो त्या सवयीप्रमाणे आल्याआल्या मी काकांना पेन ड्राईव्ह मागितला. “तुमचं पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन असेल ना? ते द्या , मी कॉंप्युटर मध्ये लोड करतो.” तेव्हा काका म्हणाले “ अरे, मी असाच गप्पा मारणार. नो प्रेसेंटेशन!” मला थोडी काळजीच वाटली.
माझ्या कॉलेजमधल्या मुलांना मी चांगलाच ओळखून होतो. त्यांना गुंतवून ठेवणे हे एक आव्हानच होते आमच्यासाठी . भल्या भल्या वक्त्यांना ते नाकी नऊ आणत. आणि तेव्हा काकांच्या वक्तृत्वाची मला काही ओळखही नव्हती. पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता!तेवढ्यात काकांनी घड्याळात पाहिले आणि म्हणाले “वुई शुड स्टार्ट नाऊ!” एका क्षणात काका उठले आणि विद्यार्थांनी गच्च भरलेल्या त्या वर्गात शिरले. त्यांच्या आवाजाने आणि नजरेने काही क्षणातच सभागृहाचा ताबा घेतला! एक तास काका बोलत होते आणि टाचणीचा आवाजही ऐकू येईल एवढी शांतता वर्गात पसरली होती. मुले अवाक होऊन ऐकत होती. त्यांच्यासाठी हा अनुभवच विलक्षण होता. काकांचा धीरगंभीर आवाज संपूर्ण खोलीत उदासारखा दरवळत होता. ते जेव्हा बोलायचे थांबले तेव्हा अवघा वर्ग स्तब्ध होता. टाळ्या वाजवण्याचेही भान कोणाला उरले नव्हते. तेवढ्यात एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला “ सर .. मला पण आर्मी जॉईन करायची आहे.” काकांनी स्मीत करीत त्याला सांगितले “निश्चित पणे कर. मीट मी आफ्टरवर्ड्स !” त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. (पुढे त्या मुलाने खरोखरच सी डी एस परिक्षा उत्तीर्ण करून आर्मी मध्ये प्रवेश केला. असे किती विद्यर्थी त्यांनी प्रेरित केले असतील?) मग थोड्या वेळाने माझ्या खोलीत चहा पिता पिता काका स्मीत हास्य करत म्हणाले “ बघितलंस माझं पॉवर पॉईंट? अरे, पॉवर आपल्या आवाजात पाहिजे आणि पॉईंट आपल्या बोलण्यात. मग पॉवर पॉईंटची काय गरज आहे?”
काकांचे हे शब्द अजूनही कानात घुमतात आणि नेहमी मार्ग दाखवतात.
त्यांच्या कथांमध्ये केवळ विरश्री नसायची, त्यात त्याग, प्रेम, प्रणय, विरह असे अनेक पदर असायचे. त्या कथा सैनिकांच्या नव्हत्या. त्या सैनिकांमधल्या माणसांच्या होत्या. आणि म्हणूनच त्या खूप जवळच्या वाटायच्या.
एकदा त्यांचा अचानक संध्याकाळी फोन आला “ अरे, तुझ्या एका कवितेतल्या ओळी माझ्या कथेत वापरू का?ह्याच्या कथानकाशी जुळणार्या ओळी आहेत. आमची विमानं एकदा वादळात सापडली होती. शेवटचा उपाय म्हणून आम्ही नॅव्हीगेशन ऑफ केलं होतं. तशाच अर्थाच्या तुझ्या ओळी आहेत.
सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो.”
अशा रितीने अगदी औपचरिकरित्या माझी परवानगी घेऊन त्यांच्याकथेत त्यांनी माझ्या कवितेतल्या त्यांना अत्यंत आवडणार्या ओळी उद्धृत केल्या होत्या.
काका स्वभावाने रसिक तर होतेच पण रसज्ञही होते. काव्य, गझल व इतर साहित्य प्रकारांची त्यांना उत्तम जाण होती. ते मनापासून बोलत व ऐकतही. त्यांना संगिताचीही आवड होती. वेळेच्या बाबतीत मात्र ते अत्यंत काटेकोर होते. “वेळेचे महत्व काय असते ते तुम्ही एका वैमानिकाला विचारा.फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद इज अल्सो इम्पॉर्टंट” असे ते म्हणत.
अनेक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. प्रत्येक महत्वाच्या सणाला त्यांचा आवर्जून फोन येत असे. घरातील सर्वांशी ते बोलत आणि सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देत. तरुण भारत, धर्मभास्कर आणि इतरही वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून त्यांच्या कथा छापून येत. माझ्या “प्राजक्त” काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षपद त्यांनी अत्यंत कौतुकाने स्विकारले होते आणि तेव्हाही ते भरभरून बोलले होते. भरभरून बोलणे व भरभरून जगणे हा त्यांचा स्थायीभावच होता.
ह्या वर्षी कोरोनाकाळात त्यांची भेट झाली नाही आणि दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला त्यांचा फोन आला तो शेवटचाच. त्या वेळेस कुठे ठाऊक होतं की हा धीरगंभीर आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही?
माणसांमध्ये राहणारा, माणसातल्या माणूसपणावर समरसून प्रेम करणारा हा आभाळासारखा उंच माणूस... आभाळावर राज्य करणारा झुंजार सैनिक, आभाळातून युद्धाचे अचुक छायाचित्रण करणारा आणि तितक्याच वेधक शब्दात ती युद्धकथा शब्दात चित्रीत करणारा हा मनस्वी कलावंत काल संध्याकाळी अचानक बॉर्डरवरून आदेश आल्यासारखा निघून गेला.
पण ते शब्द कायम मनात घर करून आहेत... “अरे, पॉवर आपल्या आवाजात पाहिजे आणि पॉईंट आपल्या बोलण्यात” !!!
---- प्रसन्न शेंबेकर
9423565101
shembekarps@gmail.com

तेरा जाना

  आज सकाळी ती बातमी आलीच – लतादिदी गेल्या ! गान-सरस्वती काळाच्या कुशीत लुप्त झाली. भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. सर्वत्र शोकसं...